Friday 1 April 2022

पर्यटन - रोहिडा

 आजचा गड होता रोहीडा, म्हणजेच विचित्रगड. याच किल्ल्याला बिनीचा किल्ला असेही संबोधले जाते. संह्याद्रीच्या महाबळेश्वर डोंगररांगेत रोहीडा विसावला आहे. गड पायथ्याला बाजारवाडी हे टुमदार आणि नीटनेटके गाव आहे. गावातली टुमटुमीत घरे पाहून तरी गाव खावून-पिवून सुखी असावे असे वाटते. गावातल्या शाळेपासून डोंगर चढायला सुरुवात होते. सुरुवातीलाच फिकट गुलाबी रंगाच्या फुलांचा बहर आपले स्वागत करतो. वाळल्यामुळे सोनेरी झालेल्या गवताचा पसारा आणि त्यातच कोवळ्या सोनेरी उन्हाने सारा परिसर झळाळून निघाला होता. निळं आकाश , पिवळट सोनेरी डोंगर, लाल माती, हिरवी झाडे, आणि दुरूनही उठून दिसणारी निलगिरीची पांढरी सरळसोट खोडं....त्या अद्वितीय चित्रकाराने एकाच चित्रात हे रंग किती चपखल योजावेत आणि सुंदर चित्र आपल्यासमोर सादर करावे. रसिक प्रेक्षकाचे मन तृप्त नाही झाले तरच नवल. बरं तो त्याच्या दालनात आपल्याला दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार, ऋतुचक्रानुसार नेहमी नवीनच चित्र सादर करत असतो त्यात नवीन रंग भरत असतो. पाहणाऱ्याने त्याचा आस्वाद घेत ते चित्र हृदयात साठवावे आणि आनंदी व्हावे. 

वाटेवरल्या डेरेदार वटवृक्षाला रामराम करत आम्ही कुच केली. सुरुवातीला वेगवेगळ्या रंगांची पुष्पगुच्छ ल्यायलेली टणटणी स्मितहास्य करत उभी ठाकली होती. कोणी कितीही या झुडपाला नावे ठेवली तरी विरान माळरानावर आपल्या सौंदर्याने ही समोरच्याला आनंद देते. गडद हिरवी पाने, पिवळी-गुलाबी-लाल-नारंगी रंगाचे इवल्याशा फुलांचे गुच्छ, हिरव्या गरगरीत इवल्या फळांनी पक्व झाल्यावर धारण केलेला गडद जांभळट रंग, सारेच कसे भुरळ घालणारे. तिचं सौंदर्य न्याहाळतच पुढे निघालो. किल्ला अगदीच अवघड नसला तरी चढाईची वाट थकवणारी आहे. चढताना क्षणभर विसावण्यासाठी एक दोन ठिकाणी लोखंडी बाकडी आपली वाट पाहत असतात. आपल्या आगमनाकडे डोळे लावून बसल्यासारखीच ती भासतात. दोन  घटका त्यांच्याशी हितगुज करून मार्गस्थ झालो. पिवळसर मुरमाड मातीच्या पायवाटेने गडावर निघालो. गड जसा हाकेच्या अंतरावर आला तशी कारवी सोबत करू लागली. सव्वा तासाच्या पायपिटीनंतर छोटेखानी गणेश दरवाजा दिसला. दरवाजा लाकडी चौकटीत बसवलेला आहे. पुढे थोड्याच अंतरावर आणखी एक दरवाजा दिसतो त्यातून पुढे गेल्यावर आत उजवीकडे भुमिगत पाण्याचे टाके व फत्ते बुरुज दिसतो. तिथून समोरच महादरवाजा आहे. महादरवाजाच्या दोन्ही बाजूला गजमुख शिल्प बसवलेले आहेत. उजव्या बाजूस फारसी तर डाव्या बाजूस देवनागरी लिपीतील शिलालेख आढळतो. महादरवाजाच्या दगडी कमानीवर कोरीव नक्षीकाम आढळते.

गडावर सदरेचे तसेच राजवाड्याचे अवशेष आढळतात. कार्यकर्त्यांनी जुन्या भांड्यांचे अवशेष एका मेजावर व्यवस्थित मांडून ठेवले आहेत ते बघायला मिळतात. गडावर चुन्याचा घाणा, पाण्याची टाकी, मुख्य तीन दरवाजांसोबतच चोर दरवाजाही पहावयास मिळतो. फत्ते बुरुज, वाघजाई बुरुज, शिरवले बुरूज, पाटणे बुरूज, दामगुडे बुरूज व सर्जा बुरुज असे एकूण ६ बुरुज आहेत. सगळे बुरुज अजूनही भक्कम उभे आहेत. दरवाजां जवळ मात्र पडझड झाल्याचे आढळते. गडाच्या रक्षणार्थ रोहिडमल्ल अजूनही सज्ज आहे. त्याला विसावन्यासाठी मंदिर बांधले आहे. शिवकार्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी गड संवर्धनाचे कार्य केल्याचे समजते. गडावर सुंदर बाग फुलवली आहे. गड सुस्थितीत राहण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. गडाचा पसारा जास्त नसल्यामुळे गड लवकर फिरून होतो. 

वाघजाई बुरुजावरुन समोर वाघजाई मातेचे मंदिर दिसते. तिकडे मातेच्या दर्शनासाठी जायचे ठरले. गणेश दरवाजा उतरत गडाला डाव्या हाताला ठेवत वळसा घालत आम्ही वाघजाई मातेच्या भेटीला निघालो. दोन्ही बाजूने पुरुषभर उंच वाढलेल्या दाट कारवीच्या ताटव्यातून तिच्या सावलीतच मळलेल्या पायवाटेने उतरत मंदिर गाठले. यात्रा, सणवार सोडलं तर एरवी वर्दळ नसल्याने मंदिर शांत आणि सुंदर आहे. तिथे बसून शांततेचा अनुभव घेत दूरवर पसरलेले रान न्याहाळत बसलो. एरवी शुष्क आणि खरखरीत वाटणारी कारवी आता तिच्या तपकिरी गुलाबी रंगाच्या कोवळ्या पानांमुळे कोण आकर्षक दिसत होती. तिच्या विविधरंगी छटांच्या फुटव्यामुळे डोंगर विविध रंगांनी शृंगारित झाल्याचा भासत होता. सुंदर निसर्ग डोळ्यात साठवत आणि आल्हाददायक हवेचा मनसोक्त आस्वाद घेत पुन्हा आल्या वाटेने घराकडे परतलो.




























उभीच आहे मूर्ती


 

पर्यटन - जीवधन

 सकाळीच निघालो. कितीही ठरवले तरी नेहमीप्रमाणे निघायला अमळ उशीरच झाला. जुन्नरच्या पुढे निघालो तेव्हा सूर्यनारायणाने मान वर काढली होती. त्याच्या सोनेरी किरणांनी सारा परिसर सुवर्णमय झाला होता. नाणेघाटा जवळच्या जिवधन किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर आम्ही पोहोचलो. हवेत गारवा होता. उजवीकडे नाणेघाटाला ठेवत डावीकडे कातळ कड्यांवर पसरलेल्या जीवधनच्या भेटीला आम्ही निघालो. जाताना जागोजागी हातपाय पसरून विसावलेले निवडुंग दिसले. सर्वत्र पसरलेल्या कुरणावर मध्येच पिटुकली रानफुले दिसली. पावसाळा संपून बराच काळ लोटल्याने सगळे ओहळ, झरे अटल्यातच जमा होते. त्यांच्या प्रवासातील शेवटचं पर्व ते पूर्ण करत होते. अगदी तळहात बुडेल येवढंच पाणी घेवून ते वाहत होते. ऐन तारुण्यात ओसंडून वाहताना मी निघालोय वाट दया ही सुचना वजा आज्ञा करण्यासाठीच जणु तो धो-धो आवाज करत मार्गस्थ होत असेल. वाट अडवणार्यांना त्याच्या शक्तीनुसार कधी हरवत आपल्यासोबत घेत, कधी अजिंक्य शत्रुसमोर माघार घेत आपली वाट बदलत न थांबता संपूर्ण सामर्थ्याने वाहत असतो. त्यावेळी त्याची शक्ती पराकोटीला गेलेली असते. शेवटच्या प्रवासात मात्र कमालीचा सौम्य होतो. लोप पावण्याआधी त्याचं पूर्वीचं रौद्र रुप कमालीचं शांत होतं. आवाजात गोडवा असतो. कोणालाही इजा न करता शांतपणे मंजूळ गीत गात प्रवास सुरु असतो. मनुष्य प्राण्याचेही काहीसे असेच नाही का? 

तर लाल फुफाट्याच्या वाटेने आम्हाला जंगलाच्या तोंडाशी सोडले. जंगलाच्या तोंडाशी बांबू बेटांच्या गर्दीने आमचे स्वागत केले. बांबूच्या कमानीतूनच आत गेलो. आत उंच दाटीवाटीत वाढलेल्या झाडांमुळे उन्हाच्या फक्त काहीच चिवट शलाका आत येऊ शकत होत्या. प्रत्येक जंगलाचा आपला असा वेगळा आवाज असतो. काही जंगलात पक्षी आणि किर्र आवाज करणाऱ्या किड्यांचं अधिपत्य असतं, तर काही ठिकाणी हुप् हुप् माकडांचं. इथे मात्र वाहणाऱ्या वार्‍याचेच राज्य होते. वाहताना हा खट्याळ वारा झाडांनाही गदागदा हलवून निघून जाई. वारा आणि हलणाऱ्या झाडांच्या आवाजा व्यतिरिक्त जंगल शांतच होते.

जंगलातल्या चढत्या वाटेने कातळात कोरलेल्या पाय-यांपर्यंत सोडले. समोर उभ्या असलेल्या उत्तुंग काळ्या कातळाचं अगदी जवळून दर्शन झालं. तो परिसरात घडणार्‍या घटना आणि बदलणारे निसर्गचक्र अगदी शांतपणे वर्षानुवर्षे पाहत निश्चल उभा आहे. त्याचं ते भव्य आणि राकट रुप पाहत त्याच्या कुशीत विसावून दुरवरचा निसर्ग न्याहाळत आणि स्वच्छंदपणे वाहणाऱ्या वाऱ्याशी कुजगोष्टी करत आपण तासनतास तिथेच बसून राहू शकतो. इथुन पुढे मात्र माणसाच्या चिकाटीला आणि कलात्मकतेला सलाम करावासा वाटतो. अभेद्य अशा कातळात मोठमोठया पाय-या कोरत त्याने वर पठारावर जाण्यासाठी वाट बनवली. कातळात कोरलेल्या पायऱ्या कल्याण दरवाजाजवळ नेतात. दरवाज्याजवळच्या काही पायऱ्यांचा रस्त्या इंग्रजांनी उद्ध्वस्त केल्याचे समजते. जिथे पाय-या नाहीत तिथे दोरखंड बांधण्यात आलेला आहे. दोरखंडाने वर गेल्यावर कल्याण दरवाजाची कमान दिसते. कमानीवर चंद्र, सुर्य आणि कलश कोरल्याचे आढळते. आत जावून बुरुजावरुन उजवीकडून चालत गेल्यास जिवधन किल्ल्याचं आकर्षण असणारा वानरलिंगी सुळका नजरेस पडतो. प्रवास सुरू केल्यापासून प्रत्येक टप्प्यावर वानरलिंगीची वेगवेगळी रुपं बघायला मिळत होती. जोरात वाहणारा वारा, एका बाजूला खाली खोल दरी, सावध बसून खाली वाकून पाहिल्यास दिसणारं हिरवंगार रान आणि समोर ते वानरलिगीचं सुंदर रुपडं. अहाहा....स्वर्ग म्हणतात तो हाच असावा बहुदा.

पुढे वर समाधि आहे. कोणाची समाधी हे मात्र मला समजले नाही. जिवाई देवीचे मंदीर आहे. मंदिराला भिंती होत्या असे म्हणण्याइतपत त्या ढासळलेल्या आहेत. पण जिवाई देवीची दगडात कोरलेली सुंदर मुर्ती मात्र अजूनही गडाचं रक्षण करत तिथेच विसावली आहे. मंदीरापासून पुढे प्रशस्त असं दगडात बांधलेलं धान्य कोठार आहे. कोठाराच्या कमानीवर आणि खांबांवर कोरीव काम आढळते. कोठार काळोखाने भरलेलं आहे. गडावर पाण्याची टाकी आहेत. हा गड नाणे घाटाच्या दळणवळणावर आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे. परिसर खुप रम्य आहे. निसर्गाने भरभरुन दान दिलेलं आहे. पावसाळ्यात इथेच reverse waterfall चा अप्रतिम अनुभव घेता येतो. उंचावरुन जोरात वाहु पाहणारा धबधबा आणि त्याच ताकदीने त्याला थोपवू पहाणारा वारा. या दोघांच्या भांडणामध्ये आपल्याला मात्र विहंगम दृश्य अनुभवायला मिळते. पुण्याजवळच्या गडकिल्ल्यांवर नेहमीच जसा गर्दीचा अनुभव येतो तो इथे येत नाही. त्यामुळे गड शांतपणे बघता येतो. निसर्गाचं आणि गडाचं लोभसवाणं रुपडं डोळ्यात साठवत आपण घरी परततो.













पर्यटन - कुकडेश्र्वर

जुन्नर तालुक्यातील हे पुरातन कुकडेश्वराचे मंदिर कुकडी नदीच्या उगम स्थानी आहे. मंदिर हेमाडपंती शैलीतले आहे. या शैलीतील मंदिरे कुठलाही चुना किंवा तत्सम गोष्टींचा वापर न करता फक्त दगड एकमेकांवर रचून मंदिरे उभारली जातात. त्यासाठी दगडांवर विशिष्ट पद्धतीने खाचा करून ती एकमेकांवर रचली जातात. मंदिराच्या मागच्या बाजूला कुकडी नदीचे उगम स्थान आहे, तिथे कुंड बांधलेले आहे. कुंडासमोर गोधन वीरगळ पहाण्यास मिळते. मंदिर क्षतिग्रस्त झाल्या कारणाने पुरातत्त्व खात्या कडून मंदिराची डागडुजी करण्यात आली आहे. येथे पाषाणात कोरलेल्या सुंदर कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरात जागोजागी यक्षांनी मंदिराचा भार उचलल्याचे दाखविले आहे. सुंदर कोरलेल्या देव देवता आहेत. कोरीव काम केलेले वेगवेगळे थर पहाण्यास मिळतात.

आपल्याला या अशा दगडात बांधलेल्या असंख्य मंदिरांचा वारसा लाभला हे आपले सौभाग्य. मंदिर आकाराने मोठे असो वा लहान, पण ही स्थापत्य कला पाहून मन थक्क होते. आपण भाग्यवान आहोत म्हणुन आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी हे पाहायला मिळते आणि त्याचे पावित्र्य अनुभवायला मिळते. त्या परमात्म्याने अशीच कृपा आपल्या येणार्‍या कित्तेक पिढ्यांवर करावी आणि मंदिराचा भार आपल्या बाजूंवर पेलून धरणाऱ्या यक्षांना बळ देऊन ही मंदिरे आपलं पावित्र्य आणि सुंदरता जपत अशीच वर्षानुवर्षे उभी राहोत हीच प्रार्थना.










Thursday 9 December 2021

पर्यटन - कोंडाणे लेणी

 डोंगरातली मळलेली पायवाट, रानात फुललेली मनमोहक रानफुले, झाडांना बिलगलेल्या वेली, किड्यांचा किर्र आवाज आणि पक्षांच्या कुंजारव ने सारे रान गजबजलेले तरीही सगळीकडे शांततेचा भास, पावसाळ्यात धो धो वाहत असणारे आणि आपल्या अस्तित्वाच्या खुणा मागे ठेवत पुढच्या ऋतुपर्यंत निद्रिस्तावस्थेत गेलेले धबधबे आणि ओहोळ, इकडून तिकडे बागडणारी कैक रंगांची फुलपाखरे, हे सगळं डोळ्यात साठवत आमची पायपीट बुद्ध लेणी पर्यंत. समोरची लेणी म्हणजे मानवी कलाकृतीचा सुंदर अविष्कार. स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण. हजारो वर्षे ती ऊन, थंडी, पाऊस, निसर्गातले अनेक बदल सोसत तिथेच उभी आहे. कैक वर्षांपूर्वी बुद्ध आचार विचाराचे कित्येक धडे तिने तिथेच गिरवले असतील. कित्येक प्रवचनांची ती साक्षीदार असेल. बौध्द भिक्खूंनी तिच्या कुशीतूनच जगाला शांततेचा संदेश दिला असेल, तो ती अजूनही विसरलेली नाही. रानावनात झाडा-झुडपात दडलेली लेणी अजूनही शांत-शीतल आहे. पावसाळ्यात लेणीवरून वाहणारा धबधबा तिचं सौंदर्य अजूनच खुलवतो, काल मात्र वरून ओघळणारे तुषारबिंदूसुद्धा सुखद अनुभव देऊन गेले. शांततेचा अनुभव घेण्यासाठी नक्कीच भेट द्यावी अशी कोंढाणे लेणी.

लेणी उतरलो तेंव्हा ऊन्हं उतरणीला आली होती. फुपाटा उडवत आमची गाडी निघाली आणि जवळूनच वाहणारी उल्हास नदी दिसली. नदी भरून वाहत जरी नसली तरी पुरेसे स्वच्छ वाहणारे पाणी आणि आजूबाजूचा रम्य परिसर खुणावत होता. असे वाहणारे पाणी मुलांसाठी पर्वणीच. मनसोक्त पाण्यात  खेळायला मिळणे याहून मुलांना दुसरा मोठा आनंद कुठला असू शकतो? काही वेळात क्षितिजावर पिवळसर नारंगी रंगाचे फराटे ओढत सूर्यनारायण क्षितिजाआड गेले. बगळ्यांचे थवे आपापल्या घरट्याकडे परतताना दिसू लागले. हवेत गारवा पसरला.थोड्याचवेळात अख्खा परिसर अंधारात बुडणार होता, आता आम्हालाही आमच्या घरट्याकडे परतणे भाग होते. पुढच्या पावसाळ्यात पुन्हा अवश्य भेट देऊ असं मनोमन ठरवतच आम्ही परतीची वाट धरली.

अवश्य भेट द्या कोंढाणे लेणी










Tuesday 18 May 2021

गोष्ट माझ्या छंदांची

मी जात्याच रंगप्रेमी बरं, लहानपणी नाही म्हंटल तरी एकटंच रानावनात हिंडत राहणं, रंगीबेरंगी पक्षी, झाडावरचे रंगीत किडे,  फुलपाखरं बघत फिरणं, हे मला फार आवडायचं. रंगांची दुनिया खुनवायची फार. शाळेत पताका लावून झाल्यावर उरलेले वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या आकाराच्या कागदांनी माझे दप्तर भरून जाई.  दप्तरात तर खूप खजिना असे तेंव्हा भरलेला, वेगवेगळे गारगोटे, सागरगोटे, रंगबेरंगी कागदे, पक्षांची आणि कोंबडयांंची वेगवेगळी पिसे, वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे मणी, पोस्टाची तिकिटं असा सगळा ऐवज माझ्या दप्तरात भरलेला असे. एकदा माझ्या मोठ्या बहिणीने आणि आईने काय कचरा भरून ठेवलाय दप्तरात म्हणून माझा लाखमोलाचा खजिना फेकुन दिला, काय वाईट वाटलं होतं म्हणून सांगू, जीव अगदी कासावीस झाला ते उकिरड्यात जाताना बघून. तेंव्हा मी आईला या सगळ्या गोष्टी टाकून देण्यापासून नाही अडवू शकले पण मी या गोष्टी साठवण्यापासून परावृत्त मात्र  झाले नव्हते, पुन्हांदा मी हा सगळा खजिना गोळा करायला सुरुवात केलीच.

बरं मग हे सगळं गोळा करून काय करते हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडे.

शाळेतल्या पताकांची गोळा केलेली कागदं वेगवेगळ्या आकारात चिकटवून कोलाज तयार करत असे. बरं मग तेंव्हा तर कोणा मुलांकडे फेविकोल असणं म्हणजे दुर्मिळ योग. आई-बाबांकडे असायचा फेविकॉल, पण ते काही आम्हाला त्याला हात लावू द्यायचे नाहीत, त्यांना शाळेच्या कामासाठी लागायचा. आम्ही आपले कडूनिंबाचा डिंक गोळा करत हिंडायचो आणि मिळालेला डिंक रिकाम्या झालेल्या हिंगाच्या पिवळ्या डबीत भरून त्यात पाणी घालून ठेवायचो, काही चिकटवायचं असेल तर तोच डिंक वापरता यायचा. कडुनिंबाची तपकिरी-कोवळी पाने आम्ही वहीत किंवा पुस्तकात ठेवत असू, काही दिवसानंतर त्या कोवळ्या पानांच्या रंगाचा छाप वहीत उमटत असे. गोळा केलेली पक्षांची पिसे एका वहीत चिकटवून ठेवली होती, पोस्टाच्या तिकिटांचही तसंच. त्या वेगवेगळ्या गोष्टी चिकटवलेल्या वह्यांकडे बघून स्वतःच स्वतःची पाठ थोपटत असे. गोळा केलेले मणी तारेमध्ये ओवून कानातले बनवत असे आणि ते चक्क मी वापरतही असे, न्युजपेपर मधली रंगीबेरंगी कागद टिकलीच्या आकाराचे कापून ठेवी आणि ड्रेसवर मॅचिंग असलेला कागद निवडून कपाळावर खाली गंद लावून ओल्या गंदावर तो कागद चिकटवीत असे. मॅचिंग टिकली लावायची हौस भागे. एका मैत्रिणीने बाभळीच्या शेंगांचे पैंजण बनवायला शिकवले होते, बाभळीच्या शेंगा वाळल्या की आतल्या बियांचा मजेशीर आवाज येई, ते पैंजण म्हणून मौजेने घाली, चॉकलेटच्या रंगीबेरंगी कागदाची अंगठी बनवून कागदाला पिळा घालून बोटाला अडकवत असे. असे काही उद्योग केले की आई ओरडत असे. कपाळावर हात मारून घेई, काय या कार्टीची लक्षण आहेत ते तिला कळत नसे. आता या सगळ्या गोष्टी आठवून स्वतःच स्वतःवर हसू येतं. 

अशा टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणं हा माझ्या अनेक छंदांपैकी एक छंद होता. वाचनाचीही मला प्रचंड आवड होती, खूप गोष्टीची पुस्तके वाचत असे. या छंदाला मात्र कोणी विरोधी नव्हता, वाचन असल्यामुळे, आणि वडीलही कविता करायचे तर आपसूकच लिहिता पण बरं यायचं. पावसाळा आला की मला दरवर्षी कविता सुचत असे. वयाप्रमाणे कविताही अगदी बालिश असल्या तरी यमक मात्र जुळलेले असत.  निबंध, कविता वयाच्या मनाने बऱ्या लिहायची मी.  चित्रं काढायला तर खूप आवडायचं. 
नंतर जसजसं बालपण सरत गेलं तसे छंद बाजूला पडत गेले. आधी अभ्यास, मग नोकरी आणि घर या गोष्टींमुळे छंद जोपासायला जमलं नाही. मग नंतर नोकरी सोडली. आता पूर्ण वेळ घर आणि मुले हीच जबाबदारी होती. मग सकाळ संध्याकाळ सोडली तर अक्खी दुपार माझीच असायची, तेंव्हा मुबलक इंटरनेट वापरायला मिळायला लागलं. Youtube या उत्कृष्ठ गुरुशी ओळख झाली, मग काय जुने विश्व पुन्हा नव्याने खुणावू लागले. असच एकदा न्युजपेपर पासून बनणाऱ्या वस्तू मला youtube वर दिसल्या. झालं तर मग, मजाच मजा. आनंद गगनात मावेना. टाकाऊ पासून टिकाऊ आणि तेही एवढ्या सुंदर वस्तू? अहाहा घबाड हाती लागल्यासारखं वाटलं. बोटं दुःखेपर्यंत कागदं वळली, त्याच्या नळ्या बनवल्या आणि टोपल्यांसारख्या विणल्या. पुठ्ठा मागे वापरून कडेने पुन्हा पेपर च्या नळ्यानी विणून मस्त फ्रेम्स बनवल्या. झालं! मनसोक्त करून झाला कुटिरोद्योग. एकदा एका फ्रेमच्या सजावटीसाठी म्हणून सिरॅमिक क्ले वापरत होते आणि त्यातच मला terracota मातीचे दागिने दिसले, म्हंटल नाही terracota पण सिरॅमिक क्लेने तर बनऊच शकतो आपण, मग काही दागिणे बनवले सिरॅमिकचे. नंतर घरी मैदा, फेविकॉल घालून घरी क्ले बनवून त्याचे दागिने बनवले, छंदांसाठी जास्त पैसे खर्च करायची सवय नव्हती ना तेंव्हा, म्हणून मग कमी पैशांमध्ये होईल तेच छंद आपले. झाले.....मातीचे बरेच दागिने बनवून झाले, ते बहिनींनी अगदी आवडीने घातले.  आता दोऱ्यापासून बनवलेले दागिने खुणावू लागले. झालं.... पुन्हा दोरे शोधण्यापासून सुरुवात, बरेच दोरे खरेदी केले, बहिणीच्या आग्रहाखातर दोऱ्याचे दागिने विकले सुद्धा, पण विकल्यावर ती करण्यातला मजा मात्र निघून जाते, ज्या गोष्टीने मनावरचा ताण निवळतो तीच गोष्ट व्यवसाय म्हणून करताना ताण वाढू लागला, मग म्हंटल नकोच हा व्यवसाय. मग काही दिवस आपले छोटे मोठे मेहंदी, रांगोळी, पेपर क्विल्लिंग, भरतकाम, विणकाम(विणकाम मात्र जमलं नाही), कपडे शिवणे, हे झालं(कपडे शिवणे हा काही माझा छंद नाही, पण मला छान बसतील असे कपडे कुठे शिऊन मिळेना, शेवटी नाईलाजाने स्वतःच शिवायला शिकले). स्वयंपाक करणे हे माझ्या छंदांमध्ये कधीच नव्हतं(नाही म्हणायला मधे एकदा प्रयत्न केला होता वेगवेगळे पदार्थ करायला, पण आमचे धनी स्वतः उत्तम भोजन बनवतात तर त्यांनी बनवलेल्या पदार्थांच्या चवीपुढे माझा काही टिकाव लागेना, हा छंद काही फार काळ टिकला नाही) पण केक वरच्या आकर्षक नक्षी मला खुणावू लागल्या आणि मी एके दिवशी जाऊन एका दिवसाचा केक शिकायचा वर्ग करून आले. त्यानंतर मात्र मी काहीही निमित्त काढुन केक बनवत असे. केक बनवण्यापेक्षा तो सजवायलाच जास्त आवडायचं, केक सजवण हाच तर मुळ उद्देश होता. पाना-फुलांची नक्षी हे मुख्य आकर्षण. मुंबईत राहणाऱ्या मैत्रिणीचा वाढदिवस मी माझ्या घरी केक कापून साजरा करू लागले, वेड हो.....एखादी गोष्ट आवडली की कंटाळा येईपर्यंत किंवा मनसोक्त म्हणा ना, ती सारखी करत राहणे हाच स्वभाव.  वर्ष दिढ वर्ष मनसोक्त केक बनवले, घरच्यांना खाऊन आणि मला बनवून कंटाळा आल्यावर नंतर मात्र माझी अगदी मनापासून आणि लहानपणापासून आवडीची असलेली गोष्ट समोर आली, चित्र काढणे. आधी फक्त पेन्सिल ने चित्र काढायची, रंग वापरायचं धाडस मात्र कधी होत नव्हतं. मात्र यावेळी जरा बळ एकवटले आणि म्हंटल की चला रंग वापरून बघुयात, आधी acrylic colours वापरायला सुरू केलं, वन स्ट्रोक पैंटिंग मध्ये मी रमले, नंतर कॅनव्हास खरेदी केले आणि वापरायच्या आधीच अचानक watercolourच्या प्रेमात कधी पडले ते कळलेच नाही. सोबतीला बागकामाचीही आवड निर्माण झाली. मग नर्सरीच्या चकरा झाल्या, जिथे जाईल तिथे माझ्याकडे नसलेल्या झाडांच्या फांदीसाठी हात पसरू लागले. फांदी लावून तिला पालवी फुटायची वाट बघणं सुरु झालं. सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात माझ्या बाल्कनीतल्या बागेने होऊ लागली. रोज मी निरीक्षण करत असे की आज कुठल्या कुठल्या झाडांना नवीन पालवी फुटली, कोणाला कळ्या आल्यात, कळी कधी उमलेल? ही सगळी निरीक्षणे सुरू झाली. प्रत्येक झाडाचा रंग, ढंग वेगळा. फुलांकडे पाहून आनंद तर होईच, पण झाडांच्या पानांचही फार आकर्षण वाटते. केवढी सुंदर पाने आणि त्यांचे वेगवेगळे आकार. पावसाळ्यात संध्याकाळी निवांत खुर्चीवर बसून उफाळत्या चहाचा घोट घेता घेता स्वतः लावलेल्या झाडांवरून पावसाचे पाणी ओघळताना पाहण्याची मजा काही औरच आहे. सध्या तरी बागकाम आणि दुपारी चित्रकला हेच छंद सुरू आहेत, चित्रे खूप सुंदर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जरी नाही काढता आली तरी मला बाई स्वतःच्या चित्रांचं भारी कौतुक. स्वतः बनवलेल्या गोष्टींवर मनापासून प्रेम करते आणि त्या बघून आनंदी होते. शेवटी आनंद महत्वाचा. माझ्या छंदांचं एक मात्र नक्की आहे की एका वेळी एकच, पण तो अगदी समोरच्याला पाहून आणि आपल्याला करून कंटाळा येईपर्यंत दिवसरात्र त्यात बुडून जायचं. करून मन तृप्त झालं की दुसरा छंद समोर आलेलाच असतो कुठलातरी, मग त्यात मनसोक्त डुंबायचं त्याचा आनंद घ्यायचा आणि आनंदी राहायचं. मैत्रिणींना दाखवायचं, चार कौतुकाचे शब्द ऐकले की दिवस अगदी मजेत जातो. 

इति गितांजली लिखितम् छंद पुराणम् संपुर्णम्।

भाषा डोळ्यांची

तुझे डोळे तुझ्या 
सौंदर्याची साक्ष आहे 
हे डोळे म्हणजेच
तुझ सौंदर्य आहे

तुझ्या डोळ्यातले भाव
काही वेगळेच असतात 
हे बोलके डोळे 
नेहमीच काहीतरी सांगतात

मला नेहमीच सांगतात ते 
कालची कथा, आजची व्यथा 
नि सांगतात ते 
उद्याची आशा

हेच काचेरी डोळे 
आरशाचही काम करतात 
तुझ्या मनाचं प्रतिबिंब 
जसच्या तसं मांडतात

मनातल्या व्यथेलाहि ते 
सुंदर बनवतात 
अश्रुंच्या थेंबालाही 
मोती बनवून पाठवतात

आनंदाच्या वेळी 
मोठे होवूनही कमी पडतात 
मग मात्र सारा आनंद 
बाहेर ओसंडू देतात

मनातली भीती तर 
पटकन डोळ्यात लपते 
जवळच कोणी दिसलं तर 
नजर तिकडेच आधी वळते

हेच सुंदर डोळे
असं काही गोड लाजतात 
आणि नकळतच मग 
पापण्यांचा पडदा ओढतात 

Tuesday 11 September 2018

ती एक वेडी…

अशीच आहे ती एक वेडी 
स्वप्नात रमणारी 
स्वप्नात हरवणारी
सुर्यास्ताचा सूर्य 
कवेत घेवू पाहणारी

अशीच आहे ती एक वेडी… 
कळी फुलल्यावरही 
आनंदाने नाचणारी 
पिवळ पान गळल तरी 
हळूच डोळे पुसणारी

अशीच आहे ती एक वेडी…  
ग्रीष्मातल्या मध्यान्ही 
वसंतप्रभा पाहणारी 
शरदाच्या रात्रीच
चांदण मुठीत धरणारी

अशीच आहे ती एक वेडी… 
पक्ष्यांचा किलबिलाट 
तन्मयतेन ऐकणारी 
झाडं झोपावी म्हणून 
अंगाई गीत गाणारी

अशीच आहे ती एक वेडी… 
वाऱ्याच्या झुळकितहि 
सायलीचा सूर शोधणारी 
खोट नाही सांगत 
अगदी अशीच, अशीच आहे 
ती एक वेडी 

आठवणी त्या रानफुलांच्या

जावू तेव्हा आपुल्या आठवणी 
मनात घर जातील करुनी 
सुख दुःखातील भागीदारी 
सहज अशी हि न संपणारी

मन हे विव्हळेन करेन तांडव 
घडेल मनस्मृतींचे दर्शन 
गतकालातील चित्रे रंगीन 
डोळ्यांसमोरून जातील तरळून

कधी रडणारे कधी रुसणारे 
आठवतील ते हसरे चेहरे
भांडणात त्या स्नेहची दडला 
सांगा कुणा मी कसे विसरावे

तळमळणाऱ्या तडफडणाऱ्या 
आनंदाने बागडणाऱ्या 
दिक्कालातून येतील परतून 
आठवणी त्या रानफुलांच्या 

रेशीमगाठ

एक सोनेरी कवडसा 
कौलारातून  घरात शिरला 
अगदी समोर येवून तो 
माझ्याशी कुजगोष्टी करू लागला

आवडलं त्याचं मला 
स्वच्छंदी जगण, अवखळ फिरणं 
नी थोड्याशा जागेतूनही 
ठसा आपला उमटवण

मी त्याच्या जवळ गेले 
कौतुकाने हातावर घेतलं 
होत कितीसं आयुष्य त्याचं 
पण जगायचं कस त्याच्याकडून शिकले

वाट चुकलेली होती ती शलाका 
कवडसा बनून घरात शिरली होती 
दुसऱ्या वाटेने गेले होते सारे 
ती वेगळीच वाट शोधत होती

मैत्री करावीशी वाटली मला 
नकळतच मी मुठ झाकली 
मुठीत बंद करू नाही शकले 
मुठीवर बसून ती मिश्किलपणे हसली

मी क्षणभर शांत बसले 
ती मात्र बोलतच होती 
नाही आवडत मला बंधन 
कवडसा मी त्यासाठीच बनले

माणसांच्या या दुनियेत तर
सारेच एकमेकांना बांधु पहातात 
रेशीमगाठ हे गोड नाव देवून 
या बंधानालाही बांधून ठेवतात