Tuesday 11 September 2018

रेशीमगाठ

एक सोनेरी कवडसा 
कौलारातून  घरात शिरला 
अगदी समोर येवून तो 
माझ्याशी कुजगोष्टी करू लागला

आवडलं त्याचं मला 
स्वच्छंदी जगण, अवखळ फिरणं 
नी थोड्याशा जागेतूनही 
ठसा आपला उमटवण

मी त्याच्या जवळ गेले 
कौतुकाने हातावर घेतलं 
होत कितीसं आयुष्य त्याचं 
पण जगायचं कस त्याच्याकडून शिकले

वाट चुकलेली होती ती शलाका 
कवडसा बनून घरात शिरली होती 
दुसऱ्या वाटेने गेले होते सारे 
ती वेगळीच वाट शोधत होती

मैत्री करावीशी वाटली मला 
नकळतच मी मुठ झाकली 
मुठीत बंद करू नाही शकले 
मुठीवर बसून ती मिश्किलपणे हसली

मी क्षणभर शांत बसले 
ती मात्र बोलतच होती 
नाही आवडत मला बंधन 
कवडसा मी त्यासाठीच बनले

माणसांच्या या दुनियेत तर
सारेच एकमेकांना बांधु पहातात 
रेशीमगाठ हे गोड नाव देवून 
या बंधानालाही बांधून ठेवतात 

3 comments:

  1. खूप छान!गुजगोष्टी करणारा सोनेरी कवडसा सुद्धा सावलीच्या बंधनात अडकला जातो.स्वच्छंद जीवनाचं प्रतीक निसर्गाच्या अनुभूतितच शोधावे लागते, हेच खरे!

    ReplyDelete