Tuesday 18 May 2021

गोष्ट माझ्या छंदांची

मी जात्याच रंगप्रेमी बरं, लहानपणी नाही म्हंटल तरी एकटंच रानावनात हिंडत राहणं, रंगीबेरंगी पक्षी, झाडावरचे रंगीत किडे,  फुलपाखरं बघत फिरणं, हे मला फार आवडायचं. रंगांची दुनिया खुनवायची फार. शाळेत पताका लावून झाल्यावर उरलेले वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या आकाराच्या कागदांनी माझे दप्तर भरून जाई.  दप्तरात तर खूप खजिना असे तेंव्हा भरलेला, वेगवेगळे गारगोटे, सागरगोटे, रंगबेरंगी कागदे, पक्षांची आणि कोंबडयांंची वेगवेगळी पिसे, वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे मणी, पोस्टाची तिकिटं असा सगळा ऐवज माझ्या दप्तरात भरलेला असे. एकदा माझ्या मोठ्या बहिणीने आणि आईने काय कचरा भरून ठेवलाय दप्तरात म्हणून माझा लाखमोलाचा खजिना फेकुन दिला, काय वाईट वाटलं होतं म्हणून सांगू, जीव अगदी कासावीस झाला ते उकिरड्यात जाताना बघून. तेंव्हा मी आईला या सगळ्या गोष्टी टाकून देण्यापासून नाही अडवू शकले पण मी या गोष्टी साठवण्यापासून परावृत्त मात्र  झाले नव्हते, पुन्हांदा मी हा सगळा खजिना गोळा करायला सुरुवात केलीच.

बरं मग हे सगळं गोळा करून काय करते हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडे.

शाळेतल्या पताकांची गोळा केलेली कागदं वेगवेगळ्या आकारात चिकटवून कोलाज तयार करत असे. बरं मग तेंव्हा तर कोणा मुलांकडे फेविकोल असणं म्हणजे दुर्मिळ योग. आई-बाबांकडे असायचा फेविकॉल, पण ते काही आम्हाला त्याला हात लावू द्यायचे नाहीत, त्यांना शाळेच्या कामासाठी लागायचा. आम्ही आपले कडूनिंबाचा डिंक गोळा करत हिंडायचो आणि मिळालेला डिंक रिकाम्या झालेल्या हिंगाच्या पिवळ्या डबीत भरून त्यात पाणी घालून ठेवायचो, काही चिकटवायचं असेल तर तोच डिंक वापरता यायचा. कडुनिंबाची तपकिरी-कोवळी पाने आम्ही वहीत किंवा पुस्तकात ठेवत असू, काही दिवसानंतर त्या कोवळ्या पानांच्या रंगाचा छाप वहीत उमटत असे. गोळा केलेली पक्षांची पिसे एका वहीत चिकटवून ठेवली होती, पोस्टाच्या तिकिटांचही तसंच. त्या वेगवेगळ्या गोष्टी चिकटवलेल्या वह्यांकडे बघून स्वतःच स्वतःची पाठ थोपटत असे. गोळा केलेले मणी तारेमध्ये ओवून कानातले बनवत असे आणि ते चक्क मी वापरतही असे, न्युजपेपर मधली रंगीबेरंगी कागद टिकलीच्या आकाराचे कापून ठेवी आणि ड्रेसवर मॅचिंग असलेला कागद निवडून कपाळावर खाली गंद लावून ओल्या गंदावर तो कागद चिकटवीत असे. मॅचिंग टिकली लावायची हौस भागे. एका मैत्रिणीने बाभळीच्या शेंगांचे पैंजण बनवायला शिकवले होते, बाभळीच्या शेंगा वाळल्या की आतल्या बियांचा मजेशीर आवाज येई, ते पैंजण म्हणून मौजेने घाली, चॉकलेटच्या रंगीबेरंगी कागदाची अंगठी बनवून कागदाला पिळा घालून बोटाला अडकवत असे. असे काही उद्योग केले की आई ओरडत असे. कपाळावर हात मारून घेई, काय या कार्टीची लक्षण आहेत ते तिला कळत नसे. आता या सगळ्या गोष्टी आठवून स्वतःच स्वतःवर हसू येतं. 

अशा टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणं हा माझ्या अनेक छंदांपैकी एक छंद होता. वाचनाचीही मला प्रचंड आवड होती, खूप गोष्टीची पुस्तके वाचत असे. या छंदाला मात्र कोणी विरोधी नव्हता, वाचन असल्यामुळे, आणि वडीलही कविता करायचे तर आपसूकच लिहिता पण बरं यायचं. पावसाळा आला की मला दरवर्षी कविता सुचत असे. वयाप्रमाणे कविताही अगदी बालिश असल्या तरी यमक मात्र जुळलेले असत.  निबंध, कविता वयाच्या मनाने बऱ्या लिहायची मी.  चित्रं काढायला तर खूप आवडायचं. 
नंतर जसजसं बालपण सरत गेलं तसे छंद बाजूला पडत गेले. आधी अभ्यास, मग नोकरी आणि घर या गोष्टींमुळे छंद जोपासायला जमलं नाही. मग नंतर नोकरी सोडली. आता पूर्ण वेळ घर आणि मुले हीच जबाबदारी होती. मग सकाळ संध्याकाळ सोडली तर अक्खी दुपार माझीच असायची, तेंव्हा मुबलक इंटरनेट वापरायला मिळायला लागलं. Youtube या उत्कृष्ठ गुरुशी ओळख झाली, मग काय जुने विश्व पुन्हा नव्याने खुणावू लागले. असच एकदा न्युजपेपर पासून बनणाऱ्या वस्तू मला youtube वर दिसल्या. झालं तर मग, मजाच मजा. आनंद गगनात मावेना. टाकाऊ पासून टिकाऊ आणि तेही एवढ्या सुंदर वस्तू? अहाहा घबाड हाती लागल्यासारखं वाटलं. बोटं दुःखेपर्यंत कागदं वळली, त्याच्या नळ्या बनवल्या आणि टोपल्यांसारख्या विणल्या. पुठ्ठा मागे वापरून कडेने पुन्हा पेपर च्या नळ्यानी विणून मस्त फ्रेम्स बनवल्या. झालं! मनसोक्त करून झाला कुटिरोद्योग. एकदा एका फ्रेमच्या सजावटीसाठी म्हणून सिरॅमिक क्ले वापरत होते आणि त्यातच मला terracota मातीचे दागिने दिसले, म्हंटल नाही terracota पण सिरॅमिक क्लेने तर बनऊच शकतो आपण, मग काही दागिणे बनवले सिरॅमिकचे. नंतर घरी मैदा, फेविकॉल घालून घरी क्ले बनवून त्याचे दागिने बनवले, छंदांसाठी जास्त पैसे खर्च करायची सवय नव्हती ना तेंव्हा, म्हणून मग कमी पैशांमध्ये होईल तेच छंद आपले. झाले.....मातीचे बरेच दागिने बनवून झाले, ते बहिनींनी अगदी आवडीने घातले.  आता दोऱ्यापासून बनवलेले दागिने खुणावू लागले. झालं.... पुन्हा दोरे शोधण्यापासून सुरुवात, बरेच दोरे खरेदी केले, बहिणीच्या आग्रहाखातर दोऱ्याचे दागिने विकले सुद्धा, पण विकल्यावर ती करण्यातला मजा मात्र निघून जाते, ज्या गोष्टीने मनावरचा ताण निवळतो तीच गोष्ट व्यवसाय म्हणून करताना ताण वाढू लागला, मग म्हंटल नकोच हा व्यवसाय. मग काही दिवस आपले छोटे मोठे मेहंदी, रांगोळी, पेपर क्विल्लिंग, भरतकाम, विणकाम(विणकाम मात्र जमलं नाही), कपडे शिवणे, हे झालं(कपडे शिवणे हा काही माझा छंद नाही, पण मला छान बसतील असे कपडे कुठे शिऊन मिळेना, शेवटी नाईलाजाने स्वतःच शिवायला शिकले). स्वयंपाक करणे हे माझ्या छंदांमध्ये कधीच नव्हतं(नाही म्हणायला मधे एकदा प्रयत्न केला होता वेगवेगळे पदार्थ करायला, पण आमचे धनी स्वतः उत्तम भोजन बनवतात तर त्यांनी बनवलेल्या पदार्थांच्या चवीपुढे माझा काही टिकाव लागेना, हा छंद काही फार काळ टिकला नाही) पण केक वरच्या आकर्षक नक्षी मला खुणावू लागल्या आणि मी एके दिवशी जाऊन एका दिवसाचा केक शिकायचा वर्ग करून आले. त्यानंतर मात्र मी काहीही निमित्त काढुन केक बनवत असे. केक बनवण्यापेक्षा तो सजवायलाच जास्त आवडायचं, केक सजवण हाच तर मुळ उद्देश होता. पाना-फुलांची नक्षी हे मुख्य आकर्षण. मुंबईत राहणाऱ्या मैत्रिणीचा वाढदिवस मी माझ्या घरी केक कापून साजरा करू लागले, वेड हो.....एखादी गोष्ट आवडली की कंटाळा येईपर्यंत किंवा मनसोक्त म्हणा ना, ती सारखी करत राहणे हाच स्वभाव.  वर्ष दिढ वर्ष मनसोक्त केक बनवले, घरच्यांना खाऊन आणि मला बनवून कंटाळा आल्यावर नंतर मात्र माझी अगदी मनापासून आणि लहानपणापासून आवडीची असलेली गोष्ट समोर आली, चित्र काढणे. आधी फक्त पेन्सिल ने चित्र काढायची, रंग वापरायचं धाडस मात्र कधी होत नव्हतं. मात्र यावेळी जरा बळ एकवटले आणि म्हंटल की चला रंग वापरून बघुयात, आधी acrylic colours वापरायला सुरू केलं, वन स्ट्रोक पैंटिंग मध्ये मी रमले, नंतर कॅनव्हास खरेदी केले आणि वापरायच्या आधीच अचानक watercolourच्या प्रेमात कधी पडले ते कळलेच नाही. सोबतीला बागकामाचीही आवड निर्माण झाली. मग नर्सरीच्या चकरा झाल्या, जिथे जाईल तिथे माझ्याकडे नसलेल्या झाडांच्या फांदीसाठी हात पसरू लागले. फांदी लावून तिला पालवी फुटायची वाट बघणं सुरु झालं. सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात माझ्या बाल्कनीतल्या बागेने होऊ लागली. रोज मी निरीक्षण करत असे की आज कुठल्या कुठल्या झाडांना नवीन पालवी फुटली, कोणाला कळ्या आल्यात, कळी कधी उमलेल? ही सगळी निरीक्षणे सुरू झाली. प्रत्येक झाडाचा रंग, ढंग वेगळा. फुलांकडे पाहून आनंद तर होईच, पण झाडांच्या पानांचही फार आकर्षण वाटते. केवढी सुंदर पाने आणि त्यांचे वेगवेगळे आकार. पावसाळ्यात संध्याकाळी निवांत खुर्चीवर बसून उफाळत्या चहाचा घोट घेता घेता स्वतः लावलेल्या झाडांवरून पावसाचे पाणी ओघळताना पाहण्याची मजा काही औरच आहे. सध्या तरी बागकाम आणि दुपारी चित्रकला हेच छंद सुरू आहेत, चित्रे खूप सुंदर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जरी नाही काढता आली तरी मला बाई स्वतःच्या चित्रांचं भारी कौतुक. स्वतः बनवलेल्या गोष्टींवर मनापासून प्रेम करते आणि त्या बघून आनंदी होते. शेवटी आनंद महत्वाचा. माझ्या छंदांचं एक मात्र नक्की आहे की एका वेळी एकच, पण तो अगदी समोरच्याला पाहून आणि आपल्याला करून कंटाळा येईपर्यंत दिवसरात्र त्यात बुडून जायचं. करून मन तृप्त झालं की दुसरा छंद समोर आलेलाच असतो कुठलातरी, मग त्यात मनसोक्त डुंबायचं त्याचा आनंद घ्यायचा आणि आनंदी राहायचं. मैत्रिणींना दाखवायचं, चार कौतुकाचे शब्द ऐकले की दिवस अगदी मजेत जातो. 

इति गितांजली लिखितम् छंद पुराणम् संपुर्णम्।

No comments:

Post a Comment