Friday 1 April 2022

पर्यटन - जीवधन

 सकाळीच निघालो. कितीही ठरवले तरी नेहमीप्रमाणे निघायला अमळ उशीरच झाला. जुन्नरच्या पुढे निघालो तेव्हा सूर्यनारायणाने मान वर काढली होती. त्याच्या सोनेरी किरणांनी सारा परिसर सुवर्णमय झाला होता. नाणेघाटा जवळच्या जिवधन किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर आम्ही पोहोचलो. हवेत गारवा होता. उजवीकडे नाणेघाटाला ठेवत डावीकडे कातळ कड्यांवर पसरलेल्या जीवधनच्या भेटीला आम्ही निघालो. जाताना जागोजागी हातपाय पसरून विसावलेले निवडुंग दिसले. सर्वत्र पसरलेल्या कुरणावर मध्येच पिटुकली रानफुले दिसली. पावसाळा संपून बराच काळ लोटल्याने सगळे ओहळ, झरे अटल्यातच जमा होते. त्यांच्या प्रवासातील शेवटचं पर्व ते पूर्ण करत होते. अगदी तळहात बुडेल येवढंच पाणी घेवून ते वाहत होते. ऐन तारुण्यात ओसंडून वाहताना मी निघालोय वाट दया ही सुचना वजा आज्ञा करण्यासाठीच जणु तो धो-धो आवाज करत मार्गस्थ होत असेल. वाट अडवणार्यांना त्याच्या शक्तीनुसार कधी हरवत आपल्यासोबत घेत, कधी अजिंक्य शत्रुसमोर माघार घेत आपली वाट बदलत न थांबता संपूर्ण सामर्थ्याने वाहत असतो. त्यावेळी त्याची शक्ती पराकोटीला गेलेली असते. शेवटच्या प्रवासात मात्र कमालीचा सौम्य होतो. लोप पावण्याआधी त्याचं पूर्वीचं रौद्र रुप कमालीचं शांत होतं. आवाजात गोडवा असतो. कोणालाही इजा न करता शांतपणे मंजूळ गीत गात प्रवास सुरु असतो. मनुष्य प्राण्याचेही काहीसे असेच नाही का? 

तर लाल फुफाट्याच्या वाटेने आम्हाला जंगलाच्या तोंडाशी सोडले. जंगलाच्या तोंडाशी बांबू बेटांच्या गर्दीने आमचे स्वागत केले. बांबूच्या कमानीतूनच आत गेलो. आत उंच दाटीवाटीत वाढलेल्या झाडांमुळे उन्हाच्या फक्त काहीच चिवट शलाका आत येऊ शकत होत्या. प्रत्येक जंगलाचा आपला असा वेगळा आवाज असतो. काही जंगलात पक्षी आणि किर्र आवाज करणाऱ्या किड्यांचं अधिपत्य असतं, तर काही ठिकाणी हुप् हुप् माकडांचं. इथे मात्र वाहणाऱ्या वार्‍याचेच राज्य होते. वाहताना हा खट्याळ वारा झाडांनाही गदागदा हलवून निघून जाई. वारा आणि हलणाऱ्या झाडांच्या आवाजा व्यतिरिक्त जंगल शांतच होते.

जंगलातल्या चढत्या वाटेने कातळात कोरलेल्या पाय-यांपर्यंत सोडले. समोर उभ्या असलेल्या उत्तुंग काळ्या कातळाचं अगदी जवळून दर्शन झालं. तो परिसरात घडणार्‍या घटना आणि बदलणारे निसर्गचक्र अगदी शांतपणे वर्षानुवर्षे पाहत निश्चल उभा आहे. त्याचं ते भव्य आणि राकट रुप पाहत त्याच्या कुशीत विसावून दुरवरचा निसर्ग न्याहाळत आणि स्वच्छंदपणे वाहणाऱ्या वाऱ्याशी कुजगोष्टी करत आपण तासनतास तिथेच बसून राहू शकतो. इथुन पुढे मात्र माणसाच्या चिकाटीला आणि कलात्मकतेला सलाम करावासा वाटतो. अभेद्य अशा कातळात मोठमोठया पाय-या कोरत त्याने वर पठारावर जाण्यासाठी वाट बनवली. कातळात कोरलेल्या पायऱ्या कल्याण दरवाजाजवळ नेतात. दरवाज्याजवळच्या काही पायऱ्यांचा रस्त्या इंग्रजांनी उद्ध्वस्त केल्याचे समजते. जिथे पाय-या नाहीत तिथे दोरखंड बांधण्यात आलेला आहे. दोरखंडाने वर गेल्यावर कल्याण दरवाजाची कमान दिसते. कमानीवर चंद्र, सुर्य आणि कलश कोरल्याचे आढळते. आत जावून बुरुजावरुन उजवीकडून चालत गेल्यास जिवधन किल्ल्याचं आकर्षण असणारा वानरलिंगी सुळका नजरेस पडतो. प्रवास सुरू केल्यापासून प्रत्येक टप्प्यावर वानरलिंगीची वेगवेगळी रुपं बघायला मिळत होती. जोरात वाहणारा वारा, एका बाजूला खाली खोल दरी, सावध बसून खाली वाकून पाहिल्यास दिसणारं हिरवंगार रान आणि समोर ते वानरलिगीचं सुंदर रुपडं. अहाहा....स्वर्ग म्हणतात तो हाच असावा बहुदा.

पुढे वर समाधि आहे. कोणाची समाधी हे मात्र मला समजले नाही. जिवाई देवीचे मंदीर आहे. मंदिराला भिंती होत्या असे म्हणण्याइतपत त्या ढासळलेल्या आहेत. पण जिवाई देवीची दगडात कोरलेली सुंदर मुर्ती मात्र अजूनही गडाचं रक्षण करत तिथेच विसावली आहे. मंदीरापासून पुढे प्रशस्त असं दगडात बांधलेलं धान्य कोठार आहे. कोठाराच्या कमानीवर आणि खांबांवर कोरीव काम आढळते. कोठार काळोखाने भरलेलं आहे. गडावर पाण्याची टाकी आहेत. हा गड नाणे घाटाच्या दळणवळणावर आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे. परिसर खुप रम्य आहे. निसर्गाने भरभरुन दान दिलेलं आहे. पावसाळ्यात इथेच reverse waterfall चा अप्रतिम अनुभव घेता येतो. उंचावरुन जोरात वाहु पाहणारा धबधबा आणि त्याच ताकदीने त्याला थोपवू पहाणारा वारा. या दोघांच्या भांडणामध्ये आपल्याला मात्र विहंगम दृश्य अनुभवायला मिळते. पुण्याजवळच्या गडकिल्ल्यांवर नेहमीच जसा गर्दीचा अनुभव येतो तो इथे येत नाही. त्यामुळे गड शांतपणे बघता येतो. निसर्गाचं आणि गडाचं लोभसवाणं रुपडं डोळ्यात साठवत आपण घरी परततो.













No comments:

Post a Comment