Friday 1 April 2022

पर्यटन - रोहिडा

 आजचा गड होता रोहीडा, म्हणजेच विचित्रगड. याच किल्ल्याला बिनीचा किल्ला असेही संबोधले जाते. संह्याद्रीच्या महाबळेश्वर डोंगररांगेत रोहीडा विसावला आहे. गड पायथ्याला बाजारवाडी हे टुमदार आणि नीटनेटके गाव आहे. गावातली टुमटुमीत घरे पाहून तरी गाव खावून-पिवून सुखी असावे असे वाटते. गावातल्या शाळेपासून डोंगर चढायला सुरुवात होते. सुरुवातीलाच फिकट गुलाबी रंगाच्या फुलांचा बहर आपले स्वागत करतो. वाळल्यामुळे सोनेरी झालेल्या गवताचा पसारा आणि त्यातच कोवळ्या सोनेरी उन्हाने सारा परिसर झळाळून निघाला होता. निळं आकाश , पिवळट सोनेरी डोंगर, लाल माती, हिरवी झाडे, आणि दुरूनही उठून दिसणारी निलगिरीची पांढरी सरळसोट खोडं....त्या अद्वितीय चित्रकाराने एकाच चित्रात हे रंग किती चपखल योजावेत आणि सुंदर चित्र आपल्यासमोर सादर करावे. रसिक प्रेक्षकाचे मन तृप्त नाही झाले तरच नवल. बरं तो त्याच्या दालनात आपल्याला दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार, ऋतुचक्रानुसार नेहमी नवीनच चित्र सादर करत असतो त्यात नवीन रंग भरत असतो. पाहणाऱ्याने त्याचा आस्वाद घेत ते चित्र हृदयात साठवावे आणि आनंदी व्हावे. 

वाटेवरल्या डेरेदार वटवृक्षाला रामराम करत आम्ही कुच केली. सुरुवातीला वेगवेगळ्या रंगांची पुष्पगुच्छ ल्यायलेली टणटणी स्मितहास्य करत उभी ठाकली होती. कोणी कितीही या झुडपाला नावे ठेवली तरी विरान माळरानावर आपल्या सौंदर्याने ही समोरच्याला आनंद देते. गडद हिरवी पाने, पिवळी-गुलाबी-लाल-नारंगी रंगाचे इवल्याशा फुलांचे गुच्छ, हिरव्या गरगरीत इवल्या फळांनी पक्व झाल्यावर धारण केलेला गडद जांभळट रंग, सारेच कसे भुरळ घालणारे. तिचं सौंदर्य न्याहाळतच पुढे निघालो. किल्ला अगदीच अवघड नसला तरी चढाईची वाट थकवणारी आहे. चढताना क्षणभर विसावण्यासाठी एक दोन ठिकाणी लोखंडी बाकडी आपली वाट पाहत असतात. आपल्या आगमनाकडे डोळे लावून बसल्यासारखीच ती भासतात. दोन  घटका त्यांच्याशी हितगुज करून मार्गस्थ झालो. पिवळसर मुरमाड मातीच्या पायवाटेने गडावर निघालो. गड जसा हाकेच्या अंतरावर आला तशी कारवी सोबत करू लागली. सव्वा तासाच्या पायपिटीनंतर छोटेखानी गणेश दरवाजा दिसला. दरवाजा लाकडी चौकटीत बसवलेला आहे. पुढे थोड्याच अंतरावर आणखी एक दरवाजा दिसतो त्यातून पुढे गेल्यावर आत उजवीकडे भुमिगत पाण्याचे टाके व फत्ते बुरुज दिसतो. तिथून समोरच महादरवाजा आहे. महादरवाजाच्या दोन्ही बाजूला गजमुख शिल्प बसवलेले आहेत. उजव्या बाजूस फारसी तर डाव्या बाजूस देवनागरी लिपीतील शिलालेख आढळतो. महादरवाजाच्या दगडी कमानीवर कोरीव नक्षीकाम आढळते.

गडावर सदरेचे तसेच राजवाड्याचे अवशेष आढळतात. कार्यकर्त्यांनी जुन्या भांड्यांचे अवशेष एका मेजावर व्यवस्थित मांडून ठेवले आहेत ते बघायला मिळतात. गडावर चुन्याचा घाणा, पाण्याची टाकी, मुख्य तीन दरवाजांसोबतच चोर दरवाजाही पहावयास मिळतो. फत्ते बुरुज, वाघजाई बुरुज, शिरवले बुरूज, पाटणे बुरूज, दामगुडे बुरूज व सर्जा बुरुज असे एकूण ६ बुरुज आहेत. सगळे बुरुज अजूनही भक्कम उभे आहेत. दरवाजां जवळ मात्र पडझड झाल्याचे आढळते. गडाच्या रक्षणार्थ रोहिडमल्ल अजूनही सज्ज आहे. त्याला विसावन्यासाठी मंदिर बांधले आहे. शिवकार्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी गड संवर्धनाचे कार्य केल्याचे समजते. गडावर सुंदर बाग फुलवली आहे. गड सुस्थितीत राहण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. गडाचा पसारा जास्त नसल्यामुळे गड लवकर फिरून होतो. 

वाघजाई बुरुजावरुन समोर वाघजाई मातेचे मंदिर दिसते. तिकडे मातेच्या दर्शनासाठी जायचे ठरले. गणेश दरवाजा उतरत गडाला डाव्या हाताला ठेवत वळसा घालत आम्ही वाघजाई मातेच्या भेटीला निघालो. दोन्ही बाजूने पुरुषभर उंच वाढलेल्या दाट कारवीच्या ताटव्यातून तिच्या सावलीतच मळलेल्या पायवाटेने उतरत मंदिर गाठले. यात्रा, सणवार सोडलं तर एरवी वर्दळ नसल्याने मंदिर शांत आणि सुंदर आहे. तिथे बसून शांततेचा अनुभव घेत दूरवर पसरलेले रान न्याहाळत बसलो. एरवी शुष्क आणि खरखरीत वाटणारी कारवी आता तिच्या तपकिरी गुलाबी रंगाच्या कोवळ्या पानांमुळे कोण आकर्षक दिसत होती. तिच्या विविधरंगी छटांच्या फुटव्यामुळे डोंगर विविध रंगांनी शृंगारित झाल्याचा भासत होता. सुंदर निसर्ग डोळ्यात साठवत आणि आल्हाददायक हवेचा मनसोक्त आस्वाद घेत पुन्हा आल्या वाटेने घराकडे परतलो.




























No comments:

Post a Comment