Thursday, 18 September 2014

साम्राज्ञी

जसाच्या तसा आठवतोय तो सर्वांत सुंदर चेहरा. छोटे घारे डोळे, पांढर्या झालेल्या केसांचा बुचडा, डोक्यावर पदर, कानात कुड्या, हातात काचेच्या बांगड्या, सुरुकुतलेला चेहरा नी चेहऱ्यावर पसरलेला तो भाबडेपणा आणि सच्चेपणा. शुद्ध अंतःकरण असणार्याना  ते दाखवावं लागत नाही मनातले भाव हे चेहऱ्यावर जसेच्या तसे उमटतात. ज्या व्यक्तीच्या हृदयाचा ठाव घेतल्यावर गवसतो तो फक्त आणि फक्त मायेचा झरा त्या शुद्ध, निर्मळ, प्रेमळ, पापभीरू नी भाबड्या अंतःकरणाच्या साम्राज्ञीचा चेहरा कसाही असो तो मला नेहमी सुंदरच वाटे. होय साम्राज्ञीच होती ती….आपल्या नातवंडाची….ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करून त्यांना आपलेस केल,आपल्या त्या परसबागेची….ज्याची मुलाप्रमाणे काळजी घेवून तिथलं झाड नी झाड जगवलं नी वाढवलं, आपल्या त्या टुमदार घरट्याची  जिथली पाखरं उडून गेल्यावरही आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकटीने त्याला सोबत केली. तीचं विश्व एवढच होतं. पण ते तिने प्रेमाने आणि आपुलकीने जिंकलं होतं, जपलं होतं. ही साम्राज्ञी म्हणजेच माझी आजी. यशोदा तीचं नाव. शिकलेली नसतानाही सारं गाव तिला 'मास्तरीणबाई' म्हणून ओळखे. शाळेची कधी पायरीही न चढलेल्या माझ्या या आजीला 'मास्तरीणबाई' हे पद माझ्या मास्तर आजोबांमुळे मिळालं. ते शाळेत शिक्षक असल्यामुळे लोकांच्या लेखी ते 'मास्तर' आणि माझी आजी 'मास्तरीणबाई' झाली.

ठेंगणी आणि सडपातळ बांध्याची माझी आजी कमालीची काटक होती. घरामागाचा डोंगर ती सहज आमच्या बरोबरीने चढे. उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या शेतातल्या कैर्यानी लगडलेल्या झाडांवर ती अगदी खारीसारखी सरसर चढे, नी आंबा उतरावयाचं काम करे. ती जमिनीवर बसून पाय सरळ करून सहज आपलं डोक आपल्या गुढग्याला टेकवी. ती आम्हा लहानांसोबत लहान होवून आमच्या प्रत्येक खेळात आमची सवंगडी झाली. मग तो आठ-चल्लसचा डाव असो वा पत्त्यान्मधला राजा-भिकारी, साप-शिडी असो वा कॅरम ती नेहमीच उत्साहाने खेळत. डाव जिंकल्यावर तिच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद ओसंडून वाहत.तिच्या त्या आनंदावर हे असे कित्तेक डाव ओवाळून टाकावेत ही भावना खेळात जिंकण्याची उर्मी असलेल्या बालवयातही मला व्हायची. जात्यावरची गाणी तर ती खूप उत्साहाने म्हणायची. तिचा आवाज कोकिळेसारखा सुरेल नसला तरी त्या आवाजात एक सच्चेपणा होता. आत-बाहेर असं काहीही नव्हतं त्यामुळे तो आवाजही मनाला प्रसन्न करी. ऐकताना एक प्रकारचं समाधान वाटे.

माझी आजी सुगरण होती. तिने केलेल्या मसालेभाताची सर जगातल्या कुठल्याही पदार्थाला नाही कारण ती त्यात प्रेम ओतत होती. तिच्या शिळ्या भाकरीच्या कोरक्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. माझे मसालेभाताचे डोहाळे पुरवण्यासाठी ही ऐंशी उलटलेली म्हातारी एस.टी ने घोडेगावला शुक्रवारच्या बाजारात जावून, मसालेभात करून पुन्हा एस.टी ने जुन्नरला आली. चव त्या भातात नव्हती या तिच्या प्रेमात होती, त्या आपुलकीत होती, आपल्या नातीचे डोहाळे पुरवावेत या तिच्या तगमगीत होती.

आपल्याकडे जे आहे जसं आहे ते दुसर्यांना द्यावं हि दानत तिच्यात होती. शेजारच्या लेकरांना आपलं समजून त्यांच्यावर प्रेम करावं ही आपुलकी तिच्यात होती. भलेही पुस्तकी धडे शिकली नसेल पण चांगलं माणूस म्हणून कसं जगावं हा धडा तिने कैक वेळा गिरवला होता आणि शेवटपर्यंत लक्षात ठेवला होता.
आठवणीतली आजी सांगताना शब्द सुचेनासे होतात. भावनांचा उद्रेक होतो. कसं सांगावं कशी होती ती? आजी म्हणजे भाबडेपणा, आजी म्हणजे आपुलकीचा ओलावा, आजी म्हणजे प्रेमाचा अखंड खळाळता झरा, आजी म्हणजे उत्साह, आजी म्हणजे फिरण्याची हौस, आजी म्हणजे उबदार गोधडी, आजी म्हणजे जगण्यातला आनंद.

पुन्हा गिरवलीला गेल्यावर मला प्रेमाने 'तायड्या' म्हणणारी ती तिथे नसेल ही कल्पनाच करवत नाही, नव्हे आता पुन्हा तिकडे कशासाठी जायचं हे कारणच सापडत नाही. ती गेल्यापासून तीचं ते एकेकाळचं उत्साहाने भरलेलं घर एकटच उसासे टाकतय. घरातली पेटणारी चूल आता गुढग्यात मान घालून कोपर्यात शांत बसलिये. तिची टवटवीत तुळस केव्हाच सुकून गेलीय. मुलांच्या गोंगाटाणे गजबजणारं  अंगण शांत झालय. परसातली हिरवीगार झाडं आता कोरड्या डोळ्यांनी त्या बंद दाराकडे टक लावून बसलीत. सगळं कसं शांत झालय. भकास, उदास झालय. तिच्या राज्यातलं चैतन्यच हरपलय.


6 comments:

  1. Tai,mi tumche blog nehmich vachte,but this was the best...! Continue your gud work:)

    ReplyDelete
  2. Jag Mansaacha Manaatlya Dayevar Chalat Nahi,Te Tyacha Mangataatlya Balaavar Chalta.Manus keval Premaavar Jagu shakat Nahi,To itrancha Parabhav Karun jagto.
    Manushya Ya jagaat ji dhadpad karto,Ti bhogasathi ! Tyaagachi Puraana devlaat Thik astat;Pan JIVAN HE DEVAALAY NAHI ! TE RANAANGAN AAHE !....
    He Ranaangan Jinknari tu SamRaadnyi...! U will never be forgotten,miss U,tujhach Sanket...!

    ReplyDelete
  3. Sanket pan shikala ki..

    ReplyDelete
  4. Khup chhan Gitu, tuzya aathavanitun pravas kartaana, swtaha tya velet jagalya sarkha vatat!

    ReplyDelete